कृष्णार्पण… कृष्णार्पण… कृष्णार्पण…

गोष्ट कधीची ते कुणी कधी नव्हतं सांगितलं … पण लहानपणच्या आजीच्या गोष्टीतली ही खूप आवडती गोष्ट… सांगायला आजीला आवडायची आणि ऐकायला आम्हाला… आजी कुठलीही असो… पण ही संवय असायचीच.. काहीही आपलं कृष्णार्पण म्हणायचं.. जेवण झालं की.. एखादं काम यशस्वी झालं की… अगदी दारावर कुणी आलं आणि भिक्षा… माधुकरी… दिली तरीही कृष्णार्पण.. असं का?? म्हटलं तर फक्त हसून द्यायचं..
आणि गोष्ट तशी साधीच होती…
एक कीर्तनकार देवळात कीर्तन करायचा तेव्हा देवळातल्या गर्दीत एक म्हातारी एका कोपऱ्यात वाती वळत कीर्तन ऐकायची.. एक वात करून बाजूला ठेवली की पुटपुटायची ओठातल्या ओठात… कृष्णार्पण… कुणाच्या काय.. तिच्याही नकळत घडायचं हे… कीर्तन संपलं की देवाला नमस्कार करायचा, बुवांच्या पाया पडायचं आणि आपलं सामान गुंडाळून घरी परतायचं.
दिवसामागून दिवस जात होते, आणि एक दिवस बुवांचं कीर्तन असं काही रंगलं… आजी ऐकता ऐकता मान डोलवत वाती वळत होती… कृष्णार्पण म्हणत होती…
आणि अचानक पुष्पक विमान की हो उतरलं देवळाच्या परिसरात. सगळे अवाक्… कुणासाठी आलं.. बुवांसाठीच असणार.. बुवांनी गाभाऱ्या कडे वळून दंडवत घातलं आणि सगळ्यांचा निरोप घेतल्यासारखं करत पुष्पक विमानाकडे प्रस्थान ठेवलं…
विमानातून उतरलेले दूत शोधत होते कुणाला… बुवांना कळलं .. सगळ्यांना कळलं.. पुष्पक बुवांसाठी नव्हतं आलं…
दूत बसलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांमधून वाट काढत पुढे जात होते.. प्रत्येकाच्या मनात उमललेली , ‘माझ्यासाठी …?’ ही आशा क्षणात मालवत होती… आपण नाही तर कोण??? उत्सुकतेने नजर दूतांचा मागोवा घेत होती…
कोण… ?
‘आज्जी… आजी…’
‘काय रे..? कृष्णार्पण..’ वात जुडीत ठेवत आजी विचारत्या झाल्या..
‘तुम्हाला न्यायला आलोय…’
‘थांब रे बाबा.. ह्या दोन वाती झाल्या की झालंच… बुवांचं कीर्तन का थांबलंय…?’
‘देवांनी बोलावणं धाडलंय… ‘
‘बुवाsss’ आजींनी वर बघितलं तर बुवा हातात हार आणि कपाळावर नाम काढायची तार घेऊन नतमस्तक उभे होते…
‘आजी, चला…’
एव्हाना वातींची जुडी झाली होती.. कृष्णार्पण .. म्हणत आजींनी ती कनवटीला लावली… चष्म्याच्या भिंगातून बारीक डोळ्याने सगळं न्याहाळत बोलल्या, ‘देवाचं बोलावणं … निघते आता…’ का .. कशाला .. कुठे.. कसलाच प्रश्न ना मनात आला आजींच्या ना चेहेऱ्यावर .. ना ओठांवर…
तुकारामांना आलं होतं विमान … तसंच आजींना ही … नशीबवान गो बाय…कृष्णार्पण…’ माझी आजी सुस्कारायची..
खूप मोठी होईपर्यंत कधी कळलंच नाही… नक्की गोष्टीत काय घडलं आणि का घडलं…?
दरम्यान आजीही देवाघरी गेली…
एकदा अशीच गावी गेले होते… गावचं देऊळ आमच्या वाड्याच्या चौकात … देवळात बुवा आजीचीच गोष्ट सांगत होते..
कृष्णार्पण… कृष्णार्पण … कृष्णार्पण…
मी क्षणात जीवाचा कान करून खांबाला टेकले… एव्हढ्या सगळ्यांमध्ये देवांनी पुष्पक आजींसाठीच धाडलं… बुवा बोलत होते… आयुष्याचा प्रत्येक क्षण निरिच्छ पणे जगत आजी कृष्णाला अर्पण करत होत्या… आयुष्य जसं येत होतं तशा सामोऱ्या जात होत्या.. का रे बाबा मीच.. म्हणून विचारत नव्हत्या… मिळाल्याची ना असोशी होती .. ना न मिळाल्याची खंत… इतकं की देवाचं बोलावणंही कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य झालं…
कृष्णार्पण… श्वासातला श्वास तीच नेणिव… जाणिवेच्याही पलीकडची… कालानुगतिक… अव्याहत… मी … माझं.. मला… कुठं मागं सुटलं आणि कधी .. तेही ना ठावे…
तो नेमून देत होता ते करणं … आणि केल्यावर त्यालाच अर्पण करणं… सहजी… देवाला पोचतं ते हे … असून नसणं… तू देतोयस ते मान्य .. आणि तुझ्यातच विलीन करायचं तेही मान्य …
बुवा बोलत होते…

कित्येक वर्षांनी हे उत्तर मिळणार होतं … सहजी…
अट्टाहासाने शोध न घेताही आत आत झिरपत होतं…
गोष्ट ना आजीची राहिली .. ना तिच्यासाठी आलेल्या पुष्पक विमानाची…
झिरपत गेलं … अणुरेणूत …कृष्णार्पण… कृष्णार्पण… कृष्णार्पण…
जे करतो त्याचं श्रेय मला हवं… मला हवं…
कशाला ग बाई..
म्हण कृष्णार्पण आणि हो मोकळी…
अंतर्बाह्य रिकामी…
श्रेय साचेल तीळातीळाननं… अहंभाव वाढेल मणामणानं…
देव आहे की नाही … हा भाग सोड.. तू तर आहेस ना…
मग करत रहा… आणि अवकाशात रिती होत रहा… रिती होत रहा … रिती होत रहा…
कृष्णार्पण … कृष्णार्पण … कृष्णार्पण…

Neelkanti Patekar™ &©
Oct 25th 2020.
16.34 pm

32 thoughts on “कृष्णार्पण… कृष्णार्पण… कृष्णार्पण…”

  1. खूप छान !आजीची आठवण सांगता सांगता एक शाश्वत मूल्य सहज ओघात, अलगदपणे पदरी टाकलंस निलू! सुंदर लेखन!👌

    Like

    1. हा हा!! ही इतकी जवळची व्यक्ती कोण… असा विचार करत असताना पट्कन ट्यूब पेटली… मस्त वाटलं .. आपल्याच माणसाचे कौतुकाचे शब्द .. !

      Like

  2. खूप सुंदर.
    नाही पुण्याची मोजणी
    नाही पापाची टोचणी
    जिणे गंगौगाचे पाणी
    म्हणणारे बाकीबाब
    आठवले. 🙏

    Like

    1. व्वा व्वा! हल्लीच पु लं चं गुण गाईन आवडी वाचलं.. त्यात भेटले बाकीबाब…

      Like

  3. आजीचं कृष्णार्पणस्तु हे जेवढे विरक्त
    निलू, तुझं लिखित कथन तेवढेच उन्मुक्त…..

    Like

  4. खूप छान…अप्रतिम…..कृष्णार्पण……मी प्रयत्न करेन कृष्णार्पणाचा….बहुतेक यातच समाधान मिळेल….🙏🙏🙏

    Like

  5. सहज समर्पण भावना.. मग त्यात कुठेही दंभ नाही.. छान गोष्ट…कृष्णार्पण..
    अभिनंदन आणि शुभेच्छा निलू..

    Like

  6. नमस्कार, माझी पणजी ( माझ्या वडिलांच्या आई ची आई ) तिला आम्ही सर्व ” काकु ” म्हणायचो चांगली १०३ वर्षे जगली आज तुमच्या या ब्लॉग मुळे तिचे ” राम” आणि ” कृष्णापर्ण अस्तू ” आठवल
    आवडलं
    – पंकज

    Like

  7. ‘अंतर्बाह्य रिकामी…
    श्रेय साचेल तीळातीळाननं… अहंभाव वाढेल मणामणानं…’
    …………..फारच छान!!!
    नीलकांती, तु खुप दिवसा पुर्वी एक लेख लिहीला होतास…. control Alt Delete सारखं आपल्या डोक्यातली hard disk पुसुन टाकायला जमले पाहिजे!!! थोडक्यात काय? सोस नको…हलके व्हा !

    Like

Leave a comment