सगळंच बदललं… अंतर्बाह्य…

अनवधानाने झेललेला एक मातीचा गोळा … सगळंच की हो बदललं त्या स्पर्शाने… प्रतिक्षिप्तच झालं…

शाळेत प्रतिक्षिप्त क्रिया शिकले होते… मेंदूने आज्ञा देण्याअगोदर घडते ती… as a reflex to some unwarranted action…

आयुष्यातलं एक वेगळंच भुयार दिसायला लागलं समोर… कधीही ही वाट चोखंदळेन असं कुणी सांगीतलं असतं… तर हसून दिलं असतं तोंडावर…

कुंभाराच्या चाकावर बसण्याचा प्रयत्न केला … अजिबात सोप्पं नव्हतं दिसतं तसं… त्यातून मला असलेला पाठीचा त्रास… पाय बधिर व्हायला लागले…

मी म्हटलं … जेनो काम तेनो ठाय.. दुजा करी तो गोता खाय… तरीही एक छोटासा चंबू बनवला… म्हटलं झालं तेव्हढं खूप झालं…

पण पाय वळायला लागले रोज धारावीकडे…
मातीची ओढ… कविकल्पना नव्हती ती आता… खरंच चैन पडेना झालं माती हातात घेतल्याविना…

चाक फिरवीशी गरा गरा… मी कोण…?

Physics, Chemistry & Algebra, Geometry सगळे नियम एकात एक गुंतून अनुभवायला लागले… पण मडकं काही कुंभारासारखं बनेना…

आणि पाठ बोलायला लागली ना… अद्वातद्वा भांडायला लागली… 20 वर्षात तिने ब्र काढला नव्हता… पण आता ऐकेच ना!!! आणि लागलेला नाद सुटेना… !!!

माती लाटून पोळीसारखी बनव ना!!

अरे व्वा!!!

ते तंत्र मस्त जमलं आणि भराभर काय काय बनायला लागलं… 2-2 फुटाच्या स्लॅब सहजी बनवायला लागले… म्हणता म्हणता कच्च्या वस्तू शेल्फ वर जमायला लागल्या…

आणि एक दिवस घरी जाताना रस्ता क्रॉस करायला divider वर उभी होते , आणि अचानक तिथंच बसून घेतलं … उभंच रहाता येईना… टॅक्सी पर्यंत पोचणं अवघड झालं…

Ligament tear.. डाव्या पायाच्या घोट्याजवळ… !

अचानक????
अचानक नाही… तुला कळलं नाही ते होतंय ते.
मग आता???
ऑपरेशन.
आणि मग…?
4-6 महिने लागतील पुन्हा नॉर्मल व्हायला…
कितीही कपाळ बडवलं तरी करणं तर होतंच…
आलिया भोगासी..


मातीमाय मातीमय झाली… पार विस्मरणात गेली…

क्रमशः …

Neelkanti Patekar™&©

1 नोव्हेंबर 2020, 16.30 hrs.

चिमटीत पकडलेला क्षण…

चिमटीत पकडलेला क्षण…..
चमत्कारच घडला म्हणायचा माझ्या आयुष्यात …. डिसेंबर 2012… ध्यानी मनी स्वप्नीही येणं केवळ अशक्यच होतं…


माझी एक जिव्हाळ्याची मैत्रीण pottery करायची. आता ती जे काय करायची ते करायची…आणि वर तूही कर .. तूही कर… असा भुंगाच लावायची माझ्यामागे…
मीही वस्ताद… जाम नाहीच म्हटलं तिला…

म्हटलं… अग, एकच कला भिनलीय माझ्यात… नौटंकी करणे अर्थात नम्र विनम्र अभिनय …

रक्तातच आहे ग बाई माझ्या ते… DNA मधेच म्हण ना!!!…अगदी सहज येतं माझ्यातून ते…’
अग पण…
पण वगैरे काही नाही… दुसरी कुठलीही कला म्हणजे मोठ्ठा ‘पण’ आहे माझ्यासाठी…
नाही म्हणजे नाही… A big NO


माझं गणित पहिल्यापासून पक्कं, त्यामुळे करकटकाने भूमितीतली नक्षी काढून कशीबशी पास व्हायची मी चित्रकलेत.

पतंग उडवणारा मुलगा वगैरे आयुष्यात काढता आला नाही मला… अ.. श…क्य होतं तेव्हाही आणि आत्ताही…


माझ्याकडे एक व्हिडिओ कॅमेरा आहे आणि तो आणला तेव्हा एक मराठी चित्रपट मी त्या कॅमेऱ्यावर केला होता शूट…. तेव्हा तिच्याच घरात शूटिंग केलं होतं मी…


मग तुझा कॅमेरा घेऊन ये आणि आम्ही pottery करताना शूट कर…
का नाही… करेन की अगदी आनंदाने करेन……
आणि पोहोचले ना मी धारावीच्या कुंभारवाड्यात… तिथंच त्यांचा क्लास चालायचा…

तिथं मला एक मस्त व्यक्ती भेटली…

म्हणजे ते होते ह्यांच्या शिक्षकांचे वडील… 60च्या दशकात जे एक सो एक अप्रतिम हिंदी चित्रपट झाले, त्यात मोठमोठे मातीचे pots त्यांनी बनवून दिले होते… त्यावेळच्या बहुतेक सगळ्या मोठया डायरेक्टर्स बरोबर त्यांनी काम केलं होतं…

इथे तर सगळे मोठ्ठे छोटे होऊन असं चिखलात खेळत होते… आणि मी जाम टेर खेचत होते त्यांची.
कॅमेरा हातात घेऊन मी त्यांच्यातून अशी फिरत होते .. अगदी ‘touch me not… please’ चेहेऱ्यानं… त्या चिखलातून अलगद वाट काढत… पण माझी वाट न लागू देता…


शूटिंग तर 10 मिनिटातच संपलं … मी उगीचच टवाळक्या करत होते…त्यांच्या चिखलात माखलेल्या रूपड्यावरून…

आणि अचानक चिखलाचा एक गोळा त्यातल्याच एकीने फेकला माझ्या दिशेनी ७-८ फुटांवरून…

आणि ओरडली ‘झेल तो निलू…’


काही कळायच्या आत मी reflexively तो झेलला…माझे कपडे खराब व्हायला नको… म्हणून असेल…


That’s that…

तो स्पर्श … ओल्या मातीचा….
त्यानंतर आजतागायत त्यात पूर्ण गाडून घेतलंय मी स्वतःला…

आहे फक्त जाणीव…

एक अननुभूत जाणीव…

Once you touch clay… it touches you deep within…
It’s very ‘touching’ … the clay….

क्रमशः …

Neelkanti Patekar™ &©

28th Oct 2020. 20.45 hrs.