सगळंच बदललं… अंतर्बाह्य…

अनवधानाने झेललेला एक मातीचा गोळा … सगळंच की हो बदललं त्या स्पर्शाने… प्रतिक्षिप्तच झालं…

शाळेत प्रतिक्षिप्त क्रिया शिकले होते… मेंदूने आज्ञा देण्याअगोदर घडते ती… as a reflex to some unwarranted action…

आयुष्यातलं एक वेगळंच भुयार दिसायला लागलं समोर… कधीही ही वाट चोखंदळेन असं कुणी सांगीतलं असतं… तर हसून दिलं असतं तोंडावर…

कुंभाराच्या चाकावर बसण्याचा प्रयत्न केला … अजिबात सोप्पं नव्हतं दिसतं तसं… त्यातून मला असलेला पाठीचा त्रास… पाय बधिर व्हायला लागले…

मी म्हटलं … जेनो काम तेनो ठाय.. दुजा करी तो गोता खाय… तरीही एक छोटासा चंबू बनवला… म्हटलं झालं तेव्हढं खूप झालं…

पण पाय वळायला लागले रोज धारावीकडे…
मातीची ओढ… कविकल्पना नव्हती ती आता… खरंच चैन पडेना झालं माती हातात घेतल्याविना…

चाक फिरवीशी गरा गरा… मी कोण…?

Physics, Chemistry & Algebra, Geometry सगळे नियम एकात एक गुंतून अनुभवायला लागले… पण मडकं काही कुंभारासारखं बनेना…

आणि पाठ बोलायला लागली ना… अद्वातद्वा भांडायला लागली… 20 वर्षात तिने ब्र काढला नव्हता… पण आता ऐकेच ना!!! आणि लागलेला नाद सुटेना… !!!

माती लाटून पोळीसारखी बनव ना!!

अरे व्वा!!!

ते तंत्र मस्त जमलं आणि भराभर काय काय बनायला लागलं… 2-2 फुटाच्या स्लॅब सहजी बनवायला लागले… म्हणता म्हणता कच्च्या वस्तू शेल्फ वर जमायला लागल्या…

आणि एक दिवस घरी जाताना रस्ता क्रॉस करायला divider वर उभी होते , आणि अचानक तिथंच बसून घेतलं … उभंच रहाता येईना… टॅक्सी पर्यंत पोचणं अवघड झालं…

Ligament tear.. डाव्या पायाच्या घोट्याजवळ… !

अचानक????
अचानक नाही… तुला कळलं नाही ते होतंय ते.
मग आता???
ऑपरेशन.
आणि मग…?
4-6 महिने लागतील पुन्हा नॉर्मल व्हायला…
कितीही कपाळ बडवलं तरी करणं तर होतंच…
आलिया भोगासी..


मातीमाय मातीमय झाली… पार विस्मरणात गेली…

क्रमशः …

Neelkanti Patekar™&©

1 नोव्हेंबर 2020, 16.30 hrs.